दप्तराचं आत्मवृत्त
जोराचा पाऊस पडत होता. शाळेला जायची वरदची गडबड सुरू होती. “आज स्वाध्यायची वही आणायला सांगितलीय, चित्रकलेचा तासही आहे. अरे बापरे प्लास्टिक पिशवीतून पुस्तकं-वह्या नाही नेल्या तर भिजतील त्यात सगळेच विषय घेऊन जावे लागणार. पण विज्ञानचे सर आज येणार नाही असंही म्हणत होते वर्गात! काय करू विज्ञानचे सर आले तर पुन्हा ओरडा आणि नाही आले तर फुकटचं ओझं. ओरड्यापेक्षा ओझं बरं. आणि हो मधल्या रेसेस्म्ध्ये आज विन्याला काल बाबांनी आणलेला psp दाखवायचा आहे.”
“वरद कोणाशी रे पुटपुटतोय ? केव्हापासून आई हाका मारतेय तुला अजूनही तू दप्तर भरतोस?” आजी म्हणाली.
“अगं आजी थांब जरा एवढी सारी पुस्तक, वह्या, डबा, बॉटल दप्तरात नको का राहायला? त्यामुळे वेळ हा लागणारच.”
“अरे, तुझ्या बाबाचं दप्तर बरं होतं. तुझा बाबा शाळेत जायचा त्यावेळचं दप्तर मी अजून जपून ठेवलंय. का माहिती आहे ? कारण तुझा बाबा पाच-सहा वर्षं एक दप्तर वापरायचा. तुझासारखा दरवर्षी नवीन दप्तर नाही लागायचं. आणि दप्तर स्वतःचं स्वतः घ्यायचा. तुझ्या दप्तरासारखं जड पण नसायचं दप्तर.”
“ए आजी माझं दप्तर मीच घेतो.”
“हो ओझेवाल्यासारखं आजी म्हणाली.”
“ए आजी मला दाखवशील का गं बाबांचं दप्तर ? का रे?”
“मला पहायचं आहे आणि माझ्या कपाटात ठेवायचं आहे. म्हणजे आपलं कुटुंब कसं एकत्र राहत तसं ह्या दप्तराचं कुटुंब एकत्र राहील. कसं रे ? बाबाचं दप्तर, माझं दप्तर. यात बाबांचं दप्तर म्हणजे माझ्या दप्तराचे बाबा झाले. मी कंटाळ्यावर केल्यावर बाबा जसे मला गोष्टी सांगतात तसंच माझ्या दप्तराला कंटाळा आला की, हे बाबा दप्तर माझ्या दप्तरालाही गोष्टी सांगेल. आहे की नाही मज्जा!”
“तुझं आपलं काहीतरीच असतं. बघावं तेव्हा तू कल्पनेतच रमून जातोस.”
“ए आजी देना गं...” “काय कसला हट्ट चालाला आहे आजीकडे ? आईने विचारलं.”
“ते आजीचं आणि माझं सिक्रेट आहे. वरद म्हणाला.”
“चल आवर लवकर स्कूल बस येईल.” आई म्हणाली. वरद लगबगीने आवरतो. आई वरदचं दप्तरात टिफिन ठेवते. वरद पाठीवर दप्तर लावतो आणि ओझेवाल्यासारखा चालू लागतो. आजी हे पाहून वरदला म्हणते, “चालला का ओझेवला शाळेला ?” वरद गाल फुगवून ‘हो’ म्हणतो. शाळेत निघून जातो. शाळेत गेल्यावर वरदचा मित्र विन्या येतो. बेंचमध्ये दप्तर ठेवताना वरदचं दप्तर खाली पडत. आणि विन्याला दाखवायला आणलेला psp तुटतो. हे पाहून वरदला रडू येतं. “तुझं दप्तर मोठं आहे. विन्या वरदला म्हणतो, “तू दप्तरात नको त्या वस्तू भरून का आणतोस ?” त्यावर वरद रागवून म्हणतो, “ तास नसताना तू वह्या-पुस्तकं आणतोस ते. शिवाय तुझ्या दप्तराचा आकारच मोठा.” वरद आणि विन्याची’ तू तू मै मै’ चालू होते. दिवसभर यातच जातो. अभ्यासात काही वरदचं लक्षच लागत नाही. शाळा सुटल्यावर पुन्हा दप्तर खांद्याला मारतो. आणि जोरात पट्टा ओढतो. यातंच क्लिपमधून पट्टा निसटतो आणि यामुळे दप्तर पाठीला लावता येत नाही म्हणून आणखीन रागावतो. रागाने घरी येऊन एका कोनात दप्तर टाकतो. “अरे काय झालं चिडायला ? आजीने विचारलं.” वरदने रागाने बघतो. “अरे वेड्या तुझ्या बाबाचं दप्तर ठेवलंय मी तुझ्या कापाटात.
“हे दप्तर असं टाकतात का वरद उचल आधी नि नेऊन ठेव कपाटात आई ओरडली.”
वरदने रागाने दप्तर नेऊन कपाटात ठेवले. आणि psp तुटला म्हणून गप्प त्याच्या खोलीत गप्प कोपऱ्यात जाऊन बसला. psp सुरू करण्याच्या प्रयत्नात असताना कपाटातून कोणीतरी काहीतरी बोलतंय असं वाटलं म्हणून कपाट उघडलं... पाहतो तर बाबा दप्तर आणि वरदच दप्तर एकमेकांशी बोलत होते. खोटं वाटतंय का तुम्हांला ? निर्जीव वस्तूला भावना असतील ना कल्पना करायला काय हरकत आहे? बाबा दप्तर वरदच्या दप्तरला म्हणाले, “काय रे बाळा काय दिवस आलेत तुझे? लहान वयात किती ओझं न्यावं लागतं तुला ? पट्टा तुटला परत म्हणजे माणसाचा पाय फाटल्यावर टाके घालतात ना तसं तुला परत शिलाई घालून शिवणार. ही आजकालची मुलं काय काय दप्तरातून नेतील याचा नेम नाही. आणि शाळेतही प्रत्येक विषयाच्या दोन-तीन वह्या असतात. पुस्तकांचा आकारही मोठा झाला. चित्रकलेच्या वह्या मोठ्या झाल्या. खेळाचं साहित्यही तुझ्यात कोंबून नेतात. टिफिन, पाण्याची बाटली, कंपासपेटी, रंगपेटी या साऱ्या साहित्याच्या ओझ्याने दबून जात असशील ना तू ? शिवाय तुझ्यासारखी नवजात अनेक दप्तर बाळांना बालकामगार म्हणून कामही करावी लागते. तुमचे मालक म्हणजे दप्तर वापरणारी ही मुले तुला नीट जपूनही वापरत नाही. सायकल वर दाबून तुला बांधतात तेव्हा तुझा जीव गुदमरत असेल ना ? कसाही पट्टा ओढतात, चेन ओढतात तेव्हा तुझे हे अवयव दुखतही असतील ना ? त्यात तुझी शाळेत बसण्याची जागाही छोटी असते. तुझ्यासारखी दप्तरे उंची जाडीने मोठी असतील ती बेंचच्या बाजूला दिवसभर उभी राहतात हो ना ?” ह्या बाबा दप्तराचे बोलणं ऐकून या बाळ दप्तराला रडू आले. बाळ दप्तर बोलू लागले बाबा दप्तर काय सांगू तुम्हांला ही मुलं आम्हा दप्तरांना अशी वागवतात की त्यांना बोलून काहीच फायदा नाही. त्याचं वयही लहान असत. पण यात त्यांना अभ्यासाच्या पुस्तक वह्यांचा जो भार देतात त्यामुळे ही मुलं तरी काय करणार ? काही वेळा तर शाळा संपली की लगेच क्लासला जायचं असत त्या पुस्तक-वह्यांच ओझही बाळगाव लागतं. घरातही एक जागा नसते. कुठेही मला ठेवलं जातं. काही मुलं तर नवीन दप्तर मिळावं म्हणून मला मुद्दामही फाडतात. बाबा दप्तर तुमच्या वेळची परिस्थिती वेगळी होती ना ? हो आमच्या वेळी तीन-चार वर्षं एकच दप्तर वापरलं जायचं. शिवाय सगळी पुस्तक वह्या पण आम्ही नाही न्यायचो. पुस्तकही सगळी नसायची आमच्याकडे. क्लासेसहि नव्हते आमच्या काळात. आणि तुमचा आकार उभा आहे पण आमचा आकार आडवा होता. पुस्तक, वह्यांसाठी वेगळे कप्पे होते. कंपासपेटी, पट्टी, रंगपेटीसाठी वेगळे कप्पे होते. आणि आमचं सामानही कमी होतं. किती बरं झालं असतं आजच्या काळातही अशी स्तिथी असती तर... बाळ दप्तर म्हणाले. शाळेतले काही शिक्षकही मुलांना समजून नाही घेत सर्व पुस्तकं पाहिजेत असा हट्ट असतो. पूर्वी पुस्तकांचा आकारही लहान होता आता तोही वाढला. विषयही वाढले. मग ही मुलं सगळा राग आम्हा दप्तरावर काढतात. कारण एवढ ओझं काही मुलांना पेलवत नाही पर्यायी पालकांना कायम मुलाच्या दप्तराचं ओझं वाहावं लागतं. पण बाबा दप्तर तू माझाशी बोललास मला बरं वाटलं. सध्या दप्तराच्या ओझं कमी करण्यावर विचार-विनिमय आणि काही ठाम निर्णयही घेतले जात आहेत. बघू काय होतं ते ? असं म्हणून एकाएकी कपाटातून आवाज येणं बंद झालं. ही चर्चा ऐकल्यावर वरदलाही वाईट वाटलं. किती क्रूरपणे वागतो आपण दप्तराशी याची लाज वरदला वाटू लागली. खरंच सरकारने उपाय काढून आमचं दप्तराचं ओझं कमी होईल. वरद हसत हसत आजीकडे गेला आणि आजीला म्हणाला, आजी तुला एक सिक्रेट सांगू का ? कोणाला नाही सांगायचं. आजी म्हणाली, नाही मी कोणाला नाही सांगणार. आम्हांला मराठी निबंधात आत्मवृत्त लिहायला सांगितल्यावर ती निर्जीव वस्तू आपल्याशी बोलते असं समजून निबंध लिहा असं सांगतात. आज माझा psp तुटला म्हणून माझ्या दप्तराला दोषी समजत होतो. पण बाबा दप्तर आणि माझं बाळ दप्तर हे एकमेकांशी बोलू लागले तेव्हा मला कळलं दप्तराचं महत्त्व. थोडक्यात काय मी तू सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूने विचार केला. मोठा होतोय ना मी आता म्हणून! आणि खरंच आमच्या दप्तराचं ओझं कमी व्हायला हवं. एका बेंचवर दोघं बसतो मग दोघांमध्ये एक पुस्तक चालेल. दोघांनी अर्धी पुस्तकं आणली तर आमचं ओझं कमी होईल. शिवाय होमवर्क आठवड्यातून एकदा तपासावा म्हणजे दरदिवशी गृहपाठाच्या वह्यांच, वर्कबुकचं ओझं नाही होणार. शिवाय शाळेमध्ये छोटे छोटे लॉकर मुलांना उपलब्ध करून द्यायला हवेत म्हणजे काही वर्गात सोडवून घेतली जाणारी वर्कबुक, खेळाचे कपडे आम्ही लॉकरमध्ये ठेऊ शकू. बरोबर ना आजी? हो वरद माझ्या गुणी बाळा अगदी बरोबर. आणि हो psp ही काय शाळेत न्यायची वस्तू नाही. त्यामुळे अनावश्यक वस्तू दप्तरातून नेणही टाळलं पाहिजे. हो आजी आजाप्सून मी अनावश्यक गोष्टी नाही नेणार शाळेत. आणि माझं दप्तर नीट वापरेन. आणि माझ्या मित्रांनाही सांगेन. आणि आमचा हा प्रश्न सोडवायला सरकार, शिक्षक आणि पालकही आम्हांला नक्की मदत करतील!
-क्रांती गोडबोले-पाटील