Tuesday, 5 January 2016

कोकणचा कोहिनूर

कौतिक सांगू किती, पठ्ठ्या बहुगुणी ! या गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या पंक्तीप्रमाणेच गुरु ठाकूर याचं व्यक्तिमत्त्व... वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण हे गुरु ठाकूर याचं मूळ गाव. जन्मभूमी मुंबई असली तरी सुट्टीत न चुकता गुरु गावी यायचे. आणि या गावातील मातीमुळे मी घडलो असं अभिमानाने गुरु सर सांगतात. मुळात अष्टपैलू असं व्यक्तिमत्त्व, म्हणजे राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणारे गुरु ठाकूर स्तंभलेखन, कथा-पटकथा, संवाद लेखन, गीतकार, अभिनेता, कवी, छायाचित्रकार  अशी अष्टावधानी कसरत करत असतात. मोजकेच काम करेन पण लोकांच्या कायम स्मरणात राहील असं काम करीन हा आग्रह कायमच गुरु सरांचा असतो. केवळ चमकेगिरी करणं हे गुरु सरांना बिलकुल आवडत नाही. जगभारत पोचेलेले हे रत्न सतत आपल्या कामात आणि नवीन कलाकृती निर्माण करण्यात मग्न असते. मलाही याची प्रचीती आली. गुरु सरांना भेटण्याची संधी मला मिळाली नाही कारण गुरु सर परदेशी दौऱ्यावर होते म्हणून त्यांची मुलाखत फोनवरूनच घेतली. माणूस न भेटता ही माणसाच्या बोलण्यातला नम्रपणा, साधेपणा आपण ओळखू शकतो. गुरु ठाकूरही अगदी असेच.
गुरु ठाकूर याचं मुंबईतच सारं शिक्षण झालं. कॉमर्स घेऊन ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं. घराण्यातलं कोणी या क्षेत्रात नाही, विशेष या क्षेत्राचं प्रशिक्षण नाही सगळं काही शून्यातून निर्माण करत स्वतःची एक वेगळी ओळख गुरु सरांनी निर्माण केली ती केवळ मेहनतीने. मुंबईत शिकत असताना गरजेतून अचानक कविता लिहिली जाते, गाणं म्हटलं जातं, लिहिलं जातं, मॉडेलिंगही करतो, मालिकांसाठी संवादही लेखन सुरु होतं अशा अनेक कला बाहेर पडू लागतात. आणि मग सर्वांच्या चर्चेत एक नाव सतत ऐकू येऊ लागतं ते म्हणजे गुरु ठाकूर. 

बालपणाविषयी- बालपणाविषयी विचारले असता गुरु सर म्हणाले, लहानपणी खूपच बुजरा होतो. चार लोकांसमोर बोलण्याचं धाडसही माझ्यात नव्हतं. तेव्हा रेडीओचा प्रभाव अधिकच होता. गाणी सतत कानावर पडायची. त्यामुळे अनेक दिग्गज मंडळींची गाणी नुसतीच ऐकली नव्हती तर ती मनातही खचून भरली होती. शिवाय सुट्टीत कोकणात गेल्यावर गाण्याच्या भेंड्या खेळायचो. मला जुनी गाणी आणि त्यांच्या चाली आठवायच्या. पण अंतऱ्यातले शब्द विसरायचो. मग भेंड्या खेळताना मी मुखडा कायम ठेवून, पुढचे शब्द ऐनवेळी मला सुचतील ते माझ्या मनातले पेरायचो. मी असं काही करतोय हे कोणाला कळायचं नाही. इतके माझे शब्द बरोबर त्या चालीत बसायचे. मात्र एके दिवशी ही माझी चोरी माझ्या काकांनी पकडली. मी खाली मान घालत कबूल केली. काका हे पाहून म्हणाले की अरे, असा खाली मान घालून पडलेला चेहरा का करतोस ? तुझे शब्द म्हणजे उत्तम कविता आहे. मोठेपणी तू नक्की एक चांगला गीतकार बनशील. आणि काकांचे हे शब्द खरे ठरले. लेखनाने मला आत्मविश्वास दिला.

गीतकार म्हणून सुरुवात- शाळा-कॉलेजला असताना पुढे काय करायचं हे अजिबात ठरवलं नव्हतं.
खरं तर व्यंगचित्रकार म्हणून मी करिअरला सुरवात केली. स्तंभलेखन केलं. कॉलेजला असताना एकांकिका बसवायचो त्यात मी अभिनय करायचो. एक एकांकिका करताना त्यातील एका प्रसंगात गाण्याची गरज होती.चाल लावणारे होते पण शब्द दिग्गज कवींच वापरले तर त्यांची परवानगी, त्यांचं मानधन परवडलं पाहिजे म्हणून मीच एकांकीकेतल्या त्या प्रसंगाला अनुसरून कविता लिहून टाकली ते शब्द असे होते- हळुवार सांजवेळी, मन का उदास आहे’. ही माझी चालीवर पहिली कविता. पुढे माझा मित्र अमोल बावडेकर याने सुगम संगीताच्या कार्य्क्रमात ती रेडिओवर सादर केली तीथे माझी ओळख गीतकार म्हणून प्रथम झाली. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे या गाण्यापासून मी चित्रपट गीतकार म्हणून नावारूपास आलो.

व्यंगचित्रकार ते संवाद लेखन - व्यंगचित्रांच्या निमित्तानं माणसाचं निरीक्षण करण्याची माझी शक्ती वाढली. या निरीक्षणातूनच व्यक्तिचित्रं लिहू लागलो. नाटकात, मालिकेच्या चित्रीकरणस्थळी, स्टुडीओत दिसणारी माणसं- त्याचं वागणं-बोलणं याचा सतत विचार मनात सुरु असायचा. त्यांतूनच मालिकांमधली व्यक्तिचित्रं उमटली आणि गंगाधर टिपरे,नटरंग ते अगदी नारबाची वाडी पर्यंतच्या  संवाद लेख्नाला  मिळालेली दाद आणि पुरस्कार याचं ्श्रेय माझ्यातल्या व्यंगचित्रकाराला जा्तं.

मॉडेलिंग आणि अभिनय - एक एक क्षेत्रात पाऊल ठेवता-ठेवता मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्राकडेही वळलो. सुरुवातीला जाहिरातीतून मोडेलिंग केलं.अनेक हिंदी मालिकांतून अभिनयही केला.पण गीतलेख्नाचा व्याप वाढला अन या गोष्टी थांबवल्या. बर्याच वर्षानी नटरंग चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली. लवकरच  “गणवेषया चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यवर  रसिकांच्या भेटीला येतोय.

कोकणातल्या निसर्गाचा लेखनासाठी काही उपयोग झाला का ?
यावर गुरु सर म्हणाले कोकणामुळेच मी घडलो.मे मध्ये गावी कोकणात जायचो तेव्हा तिथला मध्येच अवतारणारा पाऊस, अंगणात टाकलेली वाळवणं, पाऊस आल्यावर उचलण्याची तारांबळ, पावसानंतरचा तिन्हीसांजेचा धुंद गारवा, ओलेती सांज, आवडता मारावा ऐकून शब्दांची गुंफण झाली आणि कागदावर उतरली- सरसरती हवा, छेडे मारवामग हीच कविता अगंबाई अरेच्चा मधल्या गीतांजलीच्या संवादात अंतर्भूत केलीय. त्यामुळे या कोकणातल्या निसर्गानं मला भरभरून दिलंय

तुम्ही एवढे प्रसिद्धीच्या झोतात आहात तरीही तुम्ही या प्रसिद्धीपासून दूर असता तुमचा स्वभावही शांत आहे असं ऐकलंय याविषयी काय सांगाल  माझ्याविषयी असं सांगणं चुकीच वाटेल. पण मी शांत स्वभावाचा आहे. पटकन चिडणं नाही जमत मला. समोरच्याच्या चुकीच्या वागण्याचा मी संताप करून घेत नाही किंबहुना ती व्यक्ती अशी का वागली असेल असा सकारात्मक विचार मी नेहमी करतो. आणि मला मी हे केलं हे दाखवण्यापेक्षा अजून नवीन चांगलं प्रेक्षकांना काय देता येईल या विचार कायम माझ्या मनात असतो आणि त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू असते.     

तुमच्या प्रसिद्ध गाण्यांची यादी केली तर बाकीची मुलाखत प्रसिद्ध करायला जागा पुरणार नाही. पण नटरंगची गाणी, मन उधाण वाऱ्याचे, ही गुलाबी हवा, आत्ताच माऊली- माऊली, हरवली पाखरे, मला वेड लागले यांसारखी वेगवेगळ्या विषयांची हिट गाणी आणि त्यातील अर्थपूर्ण शब्दांची गुंफण कशी काय जमते ? यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात का ? याबद्दल थोडक्यात- खरं सांगायचं तर आवड आणि ध्यास जर हातात हात घालून असतील तर तुमच्या नशिबी यश येते असं मला वाटतं. भरपूर वाचन, निरीक्षण हे कवीसाठी- लेखकासाठी अत्यंत गरजेचं असतं. उदा पंढरपूरला जाणारी वारी आपण अनेकदा पाहिली आहे. परंतु त्यावेळी त्या वारकऱ्यांचे मनातले भाव काय असतील याचा विचार जेव्हा आपण बारकाइने केला तर त्याच्या आणखी नवीन बाजूही आपल्या लक्षात येतात. कधी-कधी आधी गाण्याची चाल ठरवली जाते आणि मग त्यात फिट बसणारे शब्द हे गीतकाराला गुंफावे लागतात. हे माझ्यासाठी आव्हान असतं. परंतू अनुभव, सराव, निरीक्षण, वाचन आणि योग्य प्रकारे जमवलेल्या ज्ञानाचं उपयोजन करण्याचा माझा प्रयत्न आणि परमेश्वराची साथ यामुळे हे सारं शक्य होतं असं मला वाटतं.

आज तुम्ही यशाच्या शिखरावर आहात. परंतु या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतलात तेव्हा घरच्यांचा पाठींबा होता का ? आजच्या घडीला घरच्यांची काय प्रतिक्रिया असते ?
मी मध्यमवर्गीय घरातला असल्याने माझा चित्रपट क्षेत्रात जाण्याच्या निर्णयाने नातेवाईक नाराज होते पण आई-वडील ठामपणे माझ्या पाठीशी उभे होते. त्यांना एक आतून खात्री होती की, मी याच क्षेत्रात यशस्वी होईन. आज माझ्या आई-वडिलांचा विश्वास सार्थकी ठरला आहे. त्यामुळे सगळेच आनंदी आहेत.

जीवनातला, क्षेत्रातला आदर्श- बऱ्याचदा आदर्श कोण या क्षेत्रातला असं विचारलं जातं. जसं आताही मला तू विचारलस. तसा आदर्श कोणी नाही पण घरात लहानपणापासून दासबोध वाचला जातो त्यात समर्थानी दिलेला मंत्र मनावर कोरला गेलाय किर्ती पाहो जाता सुख नाही  सुख पाहता किर्ती नाही ।विचारेविण कोठेचिनाही।समाधान। ।।आजोबा म्हणत कीर्तिवंत व्हावं प्रसिद्ध कोणीही होतो. मला वाटतं निरपेक्षपणे स्वकर्तव्य बजावत राहिले म्हणजे नको म्हणत असताही किर्ती मागेलागते.  एकदा आदर्श पटकथाकार कोण असं विचारलं तेव्हा मी डेस्टिनी असं उत्तर दिलं आजही माझं हेच उत्तर असतं. माझ्या आयुष्यात असे प्रसंग येत गेले की काहीच ण ठरवता मला दिशा मिळत गेली. वेळेचा पुरेपूर उपयोग करत राहिलो आणि जाही करतोय. झोपल्याने आयुष्यातील बराच वेळ वाया जातो म्हणून मी रोज पहाटे दीड वाजेपर्यंत काम करतो आणि थोडावेळ झोपून लगेच सहाला उठतो. सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करत राहण्याचं व्यसनच मला जडलंय. अगदी छोट्या छोट्या अनुभवाचा फायदा कुठेना कुठे होतोच. वाया काहीच जात नसतं.

वाचकांकडून आलले अनुभव आणि लोकांच्या प्रतिक्रिया- अनेक अनुभव आणि प्रतिक्रिया आहेत पण ज्या लगेच डोळ्यांसमोर येतात त्यातला वाचकाचा एक अनुभव सांगतो- असे जगावेम्हणून माझी सोशल मिडिआवर एक कविता आहे. या कवितेवर एका मुलीने कमेंट लिहिली होती की तिची एक मैत्रीण डिप्रेशनमध्ये गेली होती. आणि आत्महत्या करणार होती पण तिने ही कविता वाचली आणि तिचा आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन बदलला. हे वाचून मला खूप आनंद झाला. असे अनुभव वाचतो तेव्हा वाचकांसाठी अजून काहीतरी चांगलं लिहावं अशी प्रेरणा मिळत राहते. मी स्वतः खूपच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन चालणारा आहे. माझ्याही स्ट्रगलिंगच्या काळात माझ्या चेहऱ्यावर उत्साह कायम असायचा. सगळ्यांना याचं आश्चर्य वाटायचं याचही उत्तर मी चारोळीतून दिलं- खिशास भोके सत्त्याहत्तर, तरी चेहरा हसरा आहे, माझ्यासाठी जगणे-उत्सव रोज दिवाळी दसरा आहे...
माझ्या कामाबद्दल लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येत असतात. नटरंग केला तेव्हाची आठवण सांगतो. कारण नटरंग मध्ये माझ्यावर पटकथा, गीतलेखन, अभिनय अशा तीन भूमिका होत्या. गाजलेल्या आणि माहिती असलेल्या कादंबरीवर हा चित्रपट करत होतो. सत्तर-ऐंशी पूर्वीचा काळ दाखवायचा. आणि यासाठी रिसर्च आणि खूप अभ्यास करावा लागला. कोल्हापुरी भाषेचा लहेजा शिकण्यासाठी कोल्हापुरात राहिलो. त्या भागातल्या लोकांच्या बोलण्याचा, विशेष करून वयस्कर व्यक्तींचं निरीकाष्ण केलं. शिव्यांपासून ओव्यांपर्यंत सारे बारकावे जाणून घेतले आणि संवाद लिहिले. लावणीच्या पारंपारिक बाजाचा  अभ्यास केला. आणि लावण्या रचल्या आणि  प्रत्यक्ष खेबुडकरांनी त्या करता कौतुक केलं आण्खी काय हवं..पुन्हा एकदा लावणी तरुणाईच्या ऒठावर आली.त्यात अश्लिल्ता टाळली त्यामुळे ती शब्दांसह साम्न्यांच्या ओठावर रुळली. तेच महत्वाचं असतं तसंच आज माऊली गाणं ऐकताना लोक सांगतात की गाणं ऐकताना आपणही त्या वारीत आहोत असंच वाटतं. आणि हे माझं एकट्याच क्रेडीट नाहीये अजय-अतुल याचं संगीतही भन्नाटच आहे.


अजय-अतुल, अशोक पत्की यांच्यासोबत काम करतानाचा तुमचा अनुभव- तू तू मीनाटकाच्या निमित्ताने माझी ओळख संगीतकार अशोक पत्की यांच्याशी झाली. त्यांची काम समजावण्याची पद्धत आवडली, सूर जुळले आणि मग सोबत काम करू लागलो. याच दरम्यान अजय-अतुल पत्की काकांबरोबर काम करत होते. त्यांच्यासोबत गीत-संगीताचे प्रयोग केले. आमची वेव्हलेंग्थ जुळते त्यामुळे आमची गाणी हिट होतात असं वाटतं.

तुम्ही साप्ताहिक मालिका लेखन करणं सोडून दिलंय का ? हिंदीतही काम करायला आवडेल का ?
हसा चकट फू साठी संवाद लेखन केलं, जगावेगळी नावाची मालिका केली. मात्र गंगाधर टिपरे मालिका पूर्ण झाल्यावर मात्र मी मालिका लेखन करणं सोडलं. कारण माझ्या मते मला टीव्हीमालिका या वृत्तपत्रासारख्या वाटतात. लोकांना रोज काहीतरी नवीन हवं असतं. रविवाराचं वर्तमानपत्र कितीही इनटरेस्तिंग असलं तरी सोमवारी त्याची रद्दीच होते. मालिकेचा एखादा एपिसोड मस्त लिहिला लोकांना आवडला तरी रिपीट टेलिकास्ट म्हणून बघताना लोकांना कंटाळा येतो. टीआरपी आणि पत्राची लोकप्रियता लक्षात ठेवून मालिका लिहावी लागते. मूळ कथानक बाजूला पडतं. आणि तिथेच कलाकृती संपते आणि व्यापार चालू होतो. मग नाविन्यतेचं समाधान मिळत नाही. म्हणून मी मालिका लिहणं थांबवलं. हिंदित ऑफर बऱ्याच आल्या पण त्या तितक्या समाधान देणा-या नव्हत्या. विधू विनेद चोप्डांच्या फेरारी की सवारी करता मी गीतलेखन केलं होतं. त्याच कौतुक ही झालं तशी संधी मिळाली तर मी हिंदीमध्ये अजूनही काम करीन.  

तुमचे आवडते गीतकार, लेखक, आवडतं ठिकाण, तुम्ही रचलेलं आवडतं गाणं कोणतं?
ज्ञानोबा तुकोबां पासून ते ग. दि. माडगुळकर,खेबुड्करांपर्यंत सारेच गीतकार म्हणून मला आवडतात. लेखकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुलंच्या व्यक्तिरेखांनी मला भारावून टाकलय. जयवंत दळवी यांच्या कथा वाचून आपणही लिहावं असं वाटलं. आणि विजय तेंडूलकर यांच्यामुळे पटकथा आणि नाट्यलेखनाकडे पहायची एक वेगळी दृष्टी मिळाली. तळकोकण हे माझं आवडतं ठिकाण आहे. माझं मी रचलेलं आवडतं गाणं सांगणं कठीण आहे कारण आईला आपली सर्वच मुले ही सारखीच असतात.

पुरस्कारांनाविषयी- बापरे! पुरस्कारांचीही यादी मोठी आहे. विकिपिडीयावर ही यादी वाचकांना वाचता येईल पण इथे आवर्जून एका पुरस्काराविषयी नक्कीच सांगावसं वाटतं नटरंगचं शुटींग चालू असताना त्या भागातले काहीजण मला येऊन विचारायचे की तुम्ही इथलेच का तेव्हा माझ्या अभ्यासाला मिळालेली पाहिली पावती मला वाटते. खुद्द आनंद यादवांनी जेव्हा सिनेमा पहिला तेव्हा माझ्या भाषेचा गोडवा, सौंदर्य शंभर टक्के जपल्याबद्दल शंभरपैकी शंभर मार्क्स अशी पावती दिली तेव्हा हा कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. 

कोकणातही अनेक लेखक मंडळी लिहण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना योग्य दिशा मिळत नाही त्याबद्दल मार्गदर्शनपर काय सांगाल-
खरंतर लेखन  ही प्रत्यएकाची व्यक्त होण्याची पद्धत असते आपली स्वतंत्र शैली निर्माण करा आणि ती जपा. कुणासारखं तरी करायचा प्रयत्नही नको कारण ते त्यानी करुन झालंय.तुमचं नवं निराळं असेल तर त्याला जास्त किंम्मत आहे.चांगलं अणि अथक लिहित रहा लोक आपोआप दखल घेतील.
  
डिजिटल काळात वाचन करणे हरवत चाललय त्याबद्दल तुमचं मत-
मला नाही वाटत. ज्याना आवड आहे ते वाचतातच.केवळ माध्यम बदललंय.पुस्तकांची जागा टॅब ने किंडल ने घेतलीय तरुणाई ऑनलाईन वाचतेय..लेखक,प्रकाशकाना वि्शेषत: मराठी लेखकांना याची द्खल घ्यावी लागेल.तिथवर आपलं साहित्य पोचवावं लागेल.
सहज-सुंदर लिखाण हे गुरु ठाकूर यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. खरंच या अलौकिक व्यक्तिमत्त्वाला भेटता आलं असतं तर माझा आनंद द्विगुणीत झाला असता. परंतु हे ही नसे थोडके. फोनवरून त्यांनी माझ्याशी संवाद साधला. आणि छान गप्पा रंगल्या. त्यांचा ह्या क्षेत्रातील प्रवास, अष्टावधानी रूप पाहिल्यावर एवढंच म्हणावसं वाटतं- गुरु नावातच नाही कार्यातही गुरुच आहे.
-शब्दांकन : क्रांती गोडबोले-पाटील



बॉक्स
ज्या कोकणाने घडवलं त्या कोकणाचं वर्णन करणारी गुरु ठाकूर यांची कविता खास कोकणी वाचकांसाठी गुरु ठाकूर यांनी दिली आहे-
पाचुच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
पिवळी पिवळी
बिट्ट्याची काचोळी
नेसल्या डोंगर वाटा
माळून गजरे
फेसाचे साजिरे
सजल्या सागर लाटा
इथल्या रानात तसाच मनांत झरतो मायेचा झरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
गंधीत धुंदीत
सायली चमेली
लाजरी लाजेची पोर
पळस पांगारा
पिंपळ पसारा
जीवाला लावतो घोर
घंटेचा निनाद घालुनिया साद सांगतो जा पोरी घरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
आंब्याला मोहर
बकुळी बहर
कहर चाफा फुले
माडाच्या सांदीला
झाडाच्या फांदीला
ईवला खोपा झुले
बोलतो कोकिळ त्याच्या ग मंजूळ तोंडाला नाही थारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
-गुरु ठाकूर

  



No comments:

Post a Comment