Wednesday, 6 January 2016

विनोदावतार
 ‘‘काय मंडळीनू बरा मा ? मी कोणी मोठो नाय. तुमच्यातलो येक. तुम्ही माका प्रेम दितास, माझा कौतुक करतास म्हणान मी आज फेमस झालंय. माझे विनोद तुमका आवडतत ह्या माका कळता तेव्हा आणखी जोमान काम करतंय.’’
 मंडळी ओळखलंत का या विनोदवीर बादशाहला? अहो तुमचा आमचा आवडता, लाडका, लोकप्रिय विनोदवीर भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम यांच्याविषयी बोलतेय मी. ‘’माका अभिमान आसा मी मालवणी असल्याचो. असं ठामपणे सांगत, आपल्या मालवणी भाषेला महाराष्ट्रभर पोहचवण्याचं काम भाऊ कदम करतायत. शांत स्वभावाचे, ‘ग’ची जराही बाधा नसलेलं व्यक्तिमत्त्व आणि विनोदाचे बादशाह म्हणजे भाऊ कदम. मालवणी मातीतला हा कलाकार म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्याशी मारलेल्या या रंजक गप्पा तुमच्यासाठी-

तुम्ही कोकणातील कुठचे ? आणि तुमचं बालपण, शिक्षण कोकणात झालं की मुंबईत?
कोकणातील कणकवली तालुक्यात सावडाव गावात आमचं मूळ घर. अधून-मधून जातो कणकवलीला. पण माझं बालपण, शिक्षण हे मात्र मुंबईतच झालं. कॉमर्स घेऊन ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं. अॅपटेकचा कोर्सही केला. आणि नोकरीकडे वळलो.

मग या क्षेत्राकडे कसे काय वळलात?
यावर भाऊ म्हणाले, माझं बालपण हे वडाळ्यातील बीपीटी कॉलनीत गेलं. त्यावेळी साजऱ्या होणाऱ्या अनेक उत्सवांमध्ये पडद्यावरचे चित्रपट. लोकनाट्य, नाटिका आवडीने पाहत असे. हे बघून बघून आम्हीम्ही मुलं एकांकिका करू लागलो. यातून आमचं काय चुकतंय हे आम्हांला कळतच नव्हतं. मात्र जे आम्ही काही करायचो ते लोकांना खूप आवडायचं. मग एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेऊन या स्पर्धा करू लागलो. यातून परीक्षकाच्याच्या मिळणाऱ्या सुचानामुळे आम्हांला आमच्यात काय बदल घडवायचे आहेत, काय चुकतंय हे कळलं. दिग्दर्शकही अभिनय कसा करतो हे पाहत असतात. मग हळू हळू यातून नाटक मिळालं. माझा अभिनय लोकांना आवडतो हे कळल्यावर नोकरी सोडली आणि या क्षेत्रात पूर्णपणे स्वतःला झोकून द्यायचं असं ठरवलं आणि आज मी विनोदी अभिनेता म्हणून तुमच्यासमोर उभा आहे.

अभिनय क्षेत्रांच तुम्ही प्रशिक्षण घेतलंत का?
अभिनयाचं मी प्रशिक्षण घेतलं नाही. ज्येष्ठ कलाकारांचा अभिनय पाहत मी शिकलो. दिग्दर्शकही आपल्याला ते पात्र कसं दिसलं पाहिजे हे नेहमीच समजावून सांगत असतात. त्यामुळे दिग्दर्शक हाही एक प्रकारे अभिनयाचे धडेच देत असतो. मी डोंबिवलीत माझ्या कुटुंबासोबत राहतो. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची जबाबदारी आम्हा सर्व भावंडावर आली. घर चालवण्यासाठी काही तरी करणं गरजेचं होतं यासाठी एक पानटपरी टाकली. या पानटपरीच्या दुकानात अनेक महिला-पुरुष व्यक्तिमत्त्व रोज पाहण्यात येत असत. त्यांच्या सवयी तसेच विशिष्ट बोलण्याची पध्दत या गोष्टींचा वापर मला अभिनय करताना उपयोगी पडला. अभिनय करताना त्या व्यक्तिरेखेचं निरीक्षण महत्त्वाचं असतं. पण स्टेजवर काम करताना मी त्या भूमिकेत रममाण होऊन जातो. तसेच ज्यावेळी माझा कार्यक्रम दाखविण्यात येतो तेव्हा तो पाहताना माझ्या कामातील चुका शोधण्याचाही मी प्रयत्न करतो आणि त्या पुढे होणार नाहीत याचीही काळजी घेतो. लोकांना माझा अभिनय आवडतो. कारण मी त्यांना त्यांच्या घरातला एक वाटतो. त्यामुळे एकलव्यासारखं मी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं.

भाऊ फु बाई फु पासून तुम्हांला विनोदाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं तुमचा मूळ स्वभावही असंच आहे का ?
हो नक्कीच माझा मूळ स्वभावही विनोदीच आहे. आजही मला मित्रांसोबत नाक्यावर, कट्ट्यावर बसून भंकस करायला आवडते. यातून अनेक कल्पना सुचत जातात. काही विनोदही वापरता येतात. मी सांगितलेले विनोद हे सर्वांना अधिक आवडतात.

विनोदी रोल करताना गंभीर भूमिका करावी असं नाही का वाटत ?
नक्कीच वाटतं. वेगळ्या भूमिका साकाराव्या असं वाटतं. ‘टाईमपास’ मध्ये बापाची गंभीर भूमिकाही मी साकारली आहे. शिवाय ‘तुझं माझं जमेना’ मालिकेमध्ये नोकराचं कामही मी केलं आहे. संधी मिळाली तर नक्कीच वेगळ्या भूमिका मला करायला आवडतील.

नाटक, चित्रपट, मालिका, रियालिटी शो यांपैकी सगळ्यात जास्त कशात काम करायला आवडतं ?
नाटकातून शिकायला खूप मिळतं. प्रेक्षकांची दाद लगेच मिळते. लाइव्ह पर्फोमन्स असल्यामुळे चुकण्याची मुभा नसतेच. आणि सतत तालीम झाल्यामुळे सगळं पाठ असतं. मात्र ‘चला हवा येऊ द्या’ सारखा शो करणं चँलेज आहे. कारण ऐनवेळी स्क्रिप्ट दिलं जातं. त्यामुळे काही क्षणातच ते पात्र उभारावं लागतं. मला सर्वच क्षेत्र आवडतात.

तुमचा अभिनय घराघरांत पोहचला आहे. या अभिनयाच्या प्रवासातील काही किस्से आम्हांला ऐकायला आवडतील.
माझ्या या प्रवासातील आठवणी किस्से बरेच आहेत. पण असा प्रश्न विचारल्यावर डोळ्यांसमोर एक किस्सा कायम आठवतो तो म्हणजे एका माऊलीचा. तीन-चार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी ‘फु बाई फु’ त्यावेळी करत होतो. चांगल्या पदावर काम करणारी एक माऊली. या माऊलीच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा अकस्मात मृत्यू होतो.  या गोष्टीचा जबर धक्का या माऊलीला बसतो. ती नोकरीवरही जाऊ शकत नाही अशी अवस्था होते. मानसिक दृष्ट्या खचून जाते. माझं ‘फु’बाई फु’ मधलं ‘जँगो’ हे बालभूमिकेतलं पात्र मी करायचो. हे पात्र साकारताना मला त्या माऊलीनं बघितलं आणि ती बोलू लागली. तिला स्वतःची मुलगी माझ्या साकारलेल्या पात्रात दिसू लागली. त्या माऊलीने माझा संपर्क शोधून काढला. माझ्याशी बोलली. आणि ती माऊली आज बरी होऊन पुन्हा नोकरी करते आहे. त्यामुळे माझा अभिनयामुळे नक्कीच घराघरांत आनंद पोहोचतोय याचं समाधान माझ्यासाठी खूप मोठं आहे.

विनोदाचा दर्जा बदललाय का ? विनोद कशाप्रकारचे असावेत आणि त्याची मर्यादा काय ? ही मर्यादा कशी सांभाळावी लागते ?
नक्कीच. पूर्वीचे विनोद आणि आताचे विनोद यात तफावत आहे. शरीराचे अंगविक्षेप करून त्यावर विनोद केले जातात. कधी कधी आम्हालाही ते करावं लागतं. कारण एक वर्ग असा आहे त्यांना हे विनोद समजतात आणि आवडतात. वाहिनीचा trp लक्षात घेऊनही असे विनोद करावे लागतात. दुसऱ्या वर्गाला हे विनोद पानचट वाटतात. कारण समाजात सर्वच उच्च प्रतीचा विनोद समजणारे लोक नसतात. आणि  आमचा प्रेक्षकवर्ग हा मुंबईपुरता मर्यादित नाही आहे. तर खेडो-पाडीही आमचे प्रेक्षक आहेत त्यांचाही विचार करून विनोद केले जातात. शिवाय काही वेळा काही प्रसंगही हे शब्दापेक्षा कृतीतून लवकर कळतात त्यामुळे अशा प्रकारचे विनोद हे केले जातात. माझ्या मते विनोद हा लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना कळणारा असावा. माझा विनोदी अभिनय लोकांना आवडतो कारण मी बोजड भाषा वापरत नाही. लोकांना त्यांचा घरातला मी एक वाटतो. आणि यामुळेच विनोद सर्वांना समजतात. विनोद हे शाब्दिक असणं केव्हाही चांगलं. शक्यता कमरेखालचे विनोद टाळावेत त्यात अश्लीलता नसावी. कारण संपूर्ण कुटुंब टीव्ही, नाटक, विनोदी कार्यक्रम बघत असतात याचं भान ठेऊन विनोद लिहावेत असं मला वाटतं.  

महाराष्टात श्रीपादकृष्ण कोल्हटकर, ची, वी जोशी, अत्रे, पु. ल यांची विनोदी लेखनाची परंपरा आहे. आज मात्र त्या दर्जाचं विनोदी साहित्य निर्माण होतंय का ?
ही सर्व मंडळी म्हणजे विनोदाचे कर्ता करविता आहेत. ह्या मंडळींनी लिहिलेलं विनोदी साहित्य आणि यातले विनोद हे निखळ आनंद देणारे विनोद होते. तसं साहित्य आज निर्माण होताना दिसत नाही. आणि त्यांचं विनोदी साहित्य समजून घेणारा वाचक वर्गही आज तेवढ्या दर्जाचा आहे का असा प्रश्न पडतो. या मंडळींच्या विनोदी शैलीप्रमाणे विनोदी साहित्य निर्माण होणं गरजेचं आहे.

एकीकडे नाटक, ‘चला हवा येऊ द्या’, चित्रपट यामध्ये तुमचं काम सुरु असतं तेव्हा कधी ह्यातलं पात्र त्यात मिक्स होत नाही का ?
प्रत्येक ठिकाणी शुटींग हे वेगवगेळ्या दिवशी असतं. कुठचा रोल करायचा आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित  असतं. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो. आणि मगच ते सादर करतो त्यामुळे असं मिक्सिंग होत नाही.

तुमचे या क्षेत्रातील गुरु कोण ? आणि कुटुंबाचा तुमच्या या करियरसाठी पाठिंबा होता का?
विजय निकम हे माझे गुरु आहेत. bmc मध्ये ते नोकरी करतात. सुरुवातीला माझ्यातली कला बघून; “भाऊ बिनधास्त पणे तू तुझी कला सादर कर. तू उत्तम अभिनय करू शकतोस.” असा आत्मविश्वास त्यांनी मला दिला आणि वेळोवेळी मदतही केली. आणि कुटुंबाचा पाठिंबा सुरुवातीला नव्हता. कारण मी सामान्य मालवणी माणूस. घर संसार कसा चालणार. नट म्हणजे दर महिन्याला फिक्स इन्कम मिळेल असं नाही. पण बायकोला मी सांगितलं, ‘एक वर्ष मला दे यात मी नक्की सेटल होईन, आणि नाही झालो तर हे सगळं सोडून नोकरी करीन.’ पण देवाच्या आणि प्रेक्षकांच्या कृपेने, मला मिळालेल्या संधी आणि या क्षेत्रातल्या बऱ्याच मंडळींची मदत यामुळे मी आज नावारूपास आलो आहे असं मला वाटतं.

तुम्ही बऱ्याचदा मालवणी भाषेतून विनोद करता ते सर्वांना कळतात का ?
विनोदाला भाषेचं बंधन आहे असं म्हणता येणार नाही. आपल्यासमोर कोणता प्रेक्षकवर्ग आहे त्याला अनुसरून आम्ही भाषा वापरतो. मुंबईत ‘करून गेलो गाव’ हे मालवणी नाटक सादर करताना मी प्रेक्षकांशी संवाद साधतो त्यांना मालवणी कळते. पण विदर्भ, सातारा या ठिकाणी काही मालवणी विनोद कळत नाहीत तेव्हा त्यांना कळेल अशी भाषा आम्ही अभिनय करताना वापरतो.



आपल्या कोकणातील लोकांकडे कला असते परंतु त्यांना योग्य दिशा मिळत नाही. अनेक कलाकारांना या क्षेत्राकडे वळायचं असतं त्यांना थोडं मार्गदर्शन.
कोकणातील माणसाने स्वतःच्या विचारसरणीत थोडे बदल केले पाहिजेत. कोकणी माणसाची वृत्ती ही मी करतो ते बरोबर आहे अशी असते. पण ही वृत्ती बदलली तर अनेक मार्ग आपल्यासाठी खुले होतात. आसपासच्या तालुक्यातील लोकांनी कौतुक केलं की, मी करतो ते बरोबर, असं वाटतं आणि मग थोडासा का होईना माणूस स्वतःला परफेक्ट समजू लागतो. त्यापेक्षा तुम्ही कोणाला माहित नाही अशा ठिकाणी कला सादर करा म्हणजे तुमच्यात काय बदल हवे, काय बरोबर काय चुकतय ते समजतं. सुरुवातीच्या काळात तुम्ही एकांकिका, नाटक बसवणाऱ्या संस्थेत सहभागी व्हा. एकांकिका स्पर्धा करा कारण एकांकिका स्पर्धा करताना समोर परीक्षक असतात ते तुमच्या अभिनयाचं परीक्षण करत असतात. तुमचं काय बरोबर काय चुकीचं ह्याचं मार्गदर्शन मिळत. नंतर नाटक करा. सतत शिकण्याची वृत्ती ठेवा. आणि या क्षेत्रात यायचं तर स्ट्रगल, मेहनत, पेशन्स खूप लागतात. या गोष्टी जर कोकणातील लोकांनी आत्मसात केल्या तर आपल्या कोकणी माणसातले कलागुण हे नक्कीच सर्वांसमोर येतील.

आतपर्यंत भाऊंनी रानभूल, करून गेलो गाव ही नाटकं, टाईमपास / टाईमपास २ यांसारखे चित्रपट, मालिका, फु बाई फु आणि ‘चला हवा येऊ द्या’ हा सध्या गाजत असलेला झी मराठी वरील टीव्ही शो तसेच अनेक कार्यक्रमांत विनोदी स्कीट करून त्यांनी आपली अभिनय कला दाखवली. आणि आज भाऊकदम हे नाव आबालवृद्धांच्या तोंडून सतत ऐकायला मिळत. आपल्या कोकणातली मालवणी माती ही कलेच्या दृष्टीने चांगलीच पोषक आहे. आणि आज अनेक कलाकार कोकणी असून त्यांनी कोकणातील कला दाखवून एक बदल घडवला आहे. हाच बदल आपणाला नक्कीच पुढे घेऊन जाईल. अतिशय शांत, गोड स्वभावाच्या भाऊ कदम  यांना मला भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या. हा अविस्मरणीय क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.
-शब्दांकन : क्रांती गोडबोले-पाटील
Krantigodbole530@gmail.com



No comments:

Post a Comment