Wednesday, 6 January 2016

दप्तराचं आत्मवृत्त

जोराचा पाऊस पडत होता. शाळेला जायची वरदची गडबड सुरू होती. “आज स्वाध्यायची वही आणायला सांगितलीय, चित्रकलेचा तासही आहे. अरे बापरे प्लास्टिक पिशवीतून पुस्तकं-वह्या नाही नेल्या तर भिजतील त्यात सगळेच विषय घेऊन जावे लागणार. पण विज्ञानचे सर आज येणार नाही असंही म्हणत होते वर्गात! काय करू विज्ञानचे सर आले तर पुन्हा ओरडा आणि नाही आले तर फुकटचं ओझं. ओरड्यापेक्षा ओझं बरं. आणि हो मधल्या रेसेस्म्ध्ये आज विन्याला काल बाबांनी आणलेला psp दाखवायचा आहे.”
“वरद कोणाशी रे पुटपुटतोय ? केव्हापासून आई हाका मारतेय तुला अजूनही तू दप्तर भरतोस?” आजी म्हणाली.
“अगं आजी थांब जरा एवढी सारी पुस्तक, वह्या, डबा, बॉटल दप्तरात नको का राहायला? त्यामुळे वेळ हा लागणारच.”
“अरे, तुझ्या बाबाचं दप्तर बरं होतं. तुझा बाबा शाळेत जायचा त्यावेळचं दप्तर मी अजून जपून ठेवलंय. का माहिती आहे ? कारण तुझा बाबा पाच-सहा वर्षं एक दप्तर वापरायचा. तुझासारखा दरवर्षी नवीन दप्तर नाही लागायचं. आणि दप्तर स्वतःचं स्वतः घ्यायचा. तुझ्या दप्तरासारखं जड पण नसायचं दप्तर.”
“ए आजी माझं दप्तर मीच घेतो.”
“हो ओझेवाल्यासारखं आजी म्हणाली.”
“ए आजी मला दाखवशील का गं बाबांचं दप्तर ? का रे?”
“मला पहायचं आहे आणि माझ्या कपाटात ठेवायचं आहे. म्हणजे आपलं कुटुंब कसं एकत्र राहत तसं ह्या दप्तराचं कुटुंब एकत्र राहील. कसं रे ? बाबाचं दप्तर, माझं दप्तर. यात बाबांचं दप्तर म्हणजे माझ्या दप्तराचे बाबा झाले. मी कंटाळ्यावर केल्यावर बाबा जसे मला गोष्टी सांगतात तसंच माझ्या दप्तराला कंटाळा आला की, हे बाबा दप्तर माझ्या दप्तरालाही गोष्टी सांगेल. आहे की नाही मज्जा!” 
“तुझं आपलं काहीतरीच असतं. बघावं तेव्हा तू कल्पनेतच रमून जातोस.”
“ए आजी देना गं...” “काय कसला हट्ट चालाला आहे आजीकडे ? आईने विचारलं.”
“ते आजीचं आणि माझं सिक्रेट आहे. वरद म्हणाला.”
“चल आवर लवकर स्कूल बस येईल.” आई म्हणाली. वरद लगबगीने आवरतो. आई वरदचं दप्तरात टिफिन ठेवते. वरद पाठीवर दप्तर लावतो आणि ओझेवाल्यासारखा चालू लागतो. आजी हे पाहून वरदला म्हणते, “चालला का ओझेवला शाळेला ?” वरद गाल फुगवून ‘हो’ म्हणतो. शाळेत निघून जातो. शाळेत गेल्यावर वरदचा मित्र विन्या येतो. बेंचमध्ये दप्तर ठेवताना वरदचं दप्तर खाली पडत. आणि विन्याला दाखवायला आणलेला psp तुटतो. हे पाहून वरदला रडू येतं. “तुझं दप्तर मोठं आहे. विन्या वरदला म्हणतो, “तू दप्तरात नको त्या वस्तू भरून का आणतोस ?” त्यावर वरद रागवून म्हणतो, “ तास नसताना तू वह्या-पुस्तकं आणतोस ते. शिवाय तुझ्या दप्तराचा आकारच मोठा.” वरद आणि विन्याची’ तू तू मै मै’ चालू होते. दिवसभर यातच जातो. अभ्यासात काही वरदचं लक्षच लागत नाही. शाळा सुटल्यावर पुन्हा दप्तर खांद्याला मारतो. आणि जोरात पट्टा ओढतो. यातंच क्लिपमधून पट्टा निसटतो आणि यामुळे दप्तर पाठीला लावता येत नाही म्हणून आणखीन रागावतो. रागाने घरी येऊन एका कोनात दप्तर टाकतो. “अरे काय झालं चिडायला ? आजीने विचारलं.” वरदने रागाने बघतो. “अरे वेड्या तुझ्या बाबाचं दप्तर ठेवलंय मी तुझ्या कापाटात.
“हे दप्तर असं टाकतात का वरद उचल आधी नि नेऊन ठेव कपाटात आई ओरडली.”
वरदने रागाने दप्तर नेऊन कपाटात ठेवले. आणि psp तुटला म्हणून गप्प त्याच्या खोलीत गप्प कोपऱ्यात जाऊन बसला. psp सुरू करण्याच्या प्रयत्नात असताना कपाटातून कोणीतरी काहीतरी बोलतंय असं वाटलं म्हणून कपाट उघडलं... पाहतो तर बाबा दप्तर आणि वरदच दप्तर एकमेकांशी बोलत होते. खोटं वाटतंय का तुम्हांला ? निर्जीव वस्तूला भावना असतील ना कल्पना करायला काय हरकत आहे? बाबा दप्तर वरदच्या दप्तरला म्हणाले, “काय रे बाळा काय दिवस आलेत तुझे? लहान वयात किती ओझं न्यावं लागतं तुला ? पट्टा तुटला परत म्हणजे माणसाचा पाय फाटल्यावर टाके घालतात ना तसं तुला परत शिलाई घालून शिवणार. ही आजकालची मुलं काय काय दप्तरातून नेतील याचा नेम नाही. आणि शाळेतही प्रत्येक विषयाच्या दोन-तीन वह्या असतात. पुस्तकांचा आकारही मोठा झाला. चित्रकलेच्या वह्या मोठ्या झाल्या. खेळाचं साहित्यही तुझ्यात कोंबून नेतात. टिफिन, पाण्याची बाटली, कंपासपेटी, रंगपेटी  या साऱ्या साहित्याच्या ओझ्याने दबून जात असशील ना तू ? शिवाय तुझ्यासारखी नवजात अनेक दप्तर बाळांना बालकामगार म्हणून कामही करावी लागते. तुमचे मालक म्हणजे दप्तर वापरणारी ही मुले तुला नीट जपूनही वापरत नाही. सायकल वर दाबून तुला बांधतात तेव्हा तुझा जीव गुदमरत असेल ना ? कसाही पट्टा ओढतात, चेन ओढतात तेव्हा तुझे हे अवयव दुखतही असतील ना ? त्यात तुझी शाळेत बसण्याची जागाही छोटी असते. तुझ्यासारखी दप्तरे उंची जाडीने मोठी असतील ती बेंचच्या बाजूला दिवसभर उभी राहतात हो ना ?” ह्या बाबा दप्तराचे बोलणं ऐकून या बाळ दप्तराला रडू आले. बाळ दप्तर बोलू लागले बाबा दप्तर काय सांगू तुम्हांला ही मुलं आम्हा दप्तरांना अशी वागवतात की त्यांना बोलून काहीच फायदा नाही. त्याचं वयही लहान असत. पण यात त्यांना अभ्यासाच्या पुस्तक वह्यांचा जो भार देतात त्यामुळे ही मुलं तरी काय करणार ? काही वेळा तर शाळा संपली की लगेच क्लासला जायचं असत त्या पुस्तक-वह्यांच ओझही बाळगाव लागतं. घरातही एक जागा नसते. कुठेही मला ठेवलं जातं. काही मुलं तर नवीन दप्तर मिळावं म्हणून मला मुद्दामही फाडतात. बाबा दप्तर तुमच्या वेळची परिस्थिती वेगळी होती ना ? हो आमच्या वेळी तीन-चार वर्षं एकच दप्तर वापरलं जायचं. शिवाय सगळी पुस्तक वह्या पण आम्ही नाही न्यायचो. पुस्तकही सगळी नसायची आमच्याकडे. क्लासेसहि नव्हते आमच्या काळात. आणि तुमचा आकार उभा आहे पण आमचा आकार आडवा होता. पुस्तक, वह्यांसाठी वेगळे कप्पे होते. कंपासपेटी, पट्टी, रंगपेटीसाठी वेगळे कप्पे होते. आणि आमचं सामानही कमी होतं. किती बरं झालं असतं आजच्या काळातही अशी स्तिथी असती तर... बाळ दप्तर म्हणाले. शाळेतले काही शिक्षकही मुलांना समजून नाही घेत सर्व पुस्तकं पाहिजेत असा हट्ट असतो. पूर्वी पुस्तकांचा आकारही लहान होता आता तोही वाढला. विषयही वाढले. मग ही मुलं सगळा राग आम्हा दप्तरावर काढतात. कारण एवढ ओझं काही मुलांना पेलवत नाही पर्यायी पालकांना कायम मुलाच्या दप्तराचं ओझं वाहावं लागतं. पण बाबा दप्तर तू माझाशी बोललास मला बरं वाटलं. सध्या दप्तराच्या ओझं कमी करण्यावर विचार-विनिमय आणि काही ठाम निर्णयही घेतले जात आहेत. बघू काय होतं ते ? असं म्हणून एकाएकी कपाटातून आवाज येणं बंद झालं. ही चर्चा ऐकल्यावर वरदलाही वाईट वाटलं. किती क्रूरपणे वागतो आपण दप्तराशी याची लाज वरदला वाटू लागली. खरंच सरकारने उपाय काढून आमचं दप्तराचं ओझं कमी होईल. वरद हसत हसत आजीकडे गेला आणि आजीला म्हणाला, आजी तुला एक सिक्रेट सांगू का ? कोणाला नाही सांगायचं. आजी म्हणाली, नाही मी कोणाला नाही सांगणार. आम्हांला मराठी निबंधात आत्मवृत्त लिहायला सांगितल्यावर ती निर्जीव वस्तू आपल्याशी बोलते असं समजून निबंध लिहा असं सांगतात. आज माझा psp तुटला म्हणून माझ्या दप्तराला दोषी समजत होतो. पण बाबा दप्तर आणि माझं बाळ दप्तर हे एकमेकांशी बोलू लागले तेव्हा मला कळलं दप्तराचं महत्त्व. थोडक्यात काय मी तू सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूने विचार केला. मोठा होतोय ना मी आता म्हणून! आणि खरंच आमच्या दप्तराचं ओझं कमी व्हायला हवं. एका बेंचवर दोघं बसतो मग दोघांमध्ये एक पुस्तक चालेल. दोघांनी अर्धी पुस्तकं आणली तर आमचं ओझं कमी होईल. शिवाय होमवर्क आठवड्यातून एकदा तपासावा म्हणजे दरदिवशी गृहपाठाच्या वह्यांच, वर्कबुकचं ओझं नाही होणार. शिवाय शाळेमध्ये छोटे छोटे लॉकर मुलांना उपलब्ध करून द्यायला हवेत म्हणजे काही वर्गात सोडवून घेतली जाणारी वर्कबुक, खेळाचे कपडे आम्ही लॉकरमध्ये ठेऊ शकू. बरोबर ना आजी? हो वरद माझ्या गुणी बाळा अगदी बरोबर. आणि हो psp ही काय शाळेत न्यायची वस्तू नाही. त्यामुळे अनावश्यक वस्तू दप्तरातून नेणही टाळलं पाहिजे. हो आजी आजाप्सून मी अनावश्यक गोष्टी नाही नेणार शाळेत. आणि माझं दप्तर नीट वापरेन. आणि माझ्या मित्रांनाही सांगेन. आणि आमचा हा प्रश्न सोडवायला सरकार, शिक्षक आणि पालकही आम्हांला नक्की मदत करतील!    

-क्रांती गोडबोले-पाटील 
विनोदावतार
 ‘‘काय मंडळीनू बरा मा ? मी कोणी मोठो नाय. तुमच्यातलो येक. तुम्ही माका प्रेम दितास, माझा कौतुक करतास म्हणान मी आज फेमस झालंय. माझे विनोद तुमका आवडतत ह्या माका कळता तेव्हा आणखी जोमान काम करतंय.’’
 मंडळी ओळखलंत का या विनोदवीर बादशाहला? अहो तुमचा आमचा आवडता, लाडका, लोकप्रिय विनोदवीर भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम यांच्याविषयी बोलतेय मी. ‘’माका अभिमान आसा मी मालवणी असल्याचो. असं ठामपणे सांगत, आपल्या मालवणी भाषेला महाराष्ट्रभर पोहचवण्याचं काम भाऊ कदम करतायत. शांत स्वभावाचे, ‘ग’ची जराही बाधा नसलेलं व्यक्तिमत्त्व आणि विनोदाचे बादशाह म्हणजे भाऊ कदम. मालवणी मातीतला हा कलाकार म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्याशी मारलेल्या या रंजक गप्पा तुमच्यासाठी-

तुम्ही कोकणातील कुठचे ? आणि तुमचं बालपण, शिक्षण कोकणात झालं की मुंबईत?
कोकणातील कणकवली तालुक्यात सावडाव गावात आमचं मूळ घर. अधून-मधून जातो कणकवलीला. पण माझं बालपण, शिक्षण हे मात्र मुंबईतच झालं. कॉमर्स घेऊन ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं. अॅपटेकचा कोर्सही केला. आणि नोकरीकडे वळलो.

मग या क्षेत्राकडे कसे काय वळलात?
यावर भाऊ म्हणाले, माझं बालपण हे वडाळ्यातील बीपीटी कॉलनीत गेलं. त्यावेळी साजऱ्या होणाऱ्या अनेक उत्सवांमध्ये पडद्यावरचे चित्रपट. लोकनाट्य, नाटिका आवडीने पाहत असे. हे बघून बघून आम्हीम्ही मुलं एकांकिका करू लागलो. यातून आमचं काय चुकतंय हे आम्हांला कळतच नव्हतं. मात्र जे आम्ही काही करायचो ते लोकांना खूप आवडायचं. मग एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेऊन या स्पर्धा करू लागलो. यातून परीक्षकाच्याच्या मिळणाऱ्या सुचानामुळे आम्हांला आमच्यात काय बदल घडवायचे आहेत, काय चुकतंय हे कळलं. दिग्दर्शकही अभिनय कसा करतो हे पाहत असतात. मग हळू हळू यातून नाटक मिळालं. माझा अभिनय लोकांना आवडतो हे कळल्यावर नोकरी सोडली आणि या क्षेत्रात पूर्णपणे स्वतःला झोकून द्यायचं असं ठरवलं आणि आज मी विनोदी अभिनेता म्हणून तुमच्यासमोर उभा आहे.

अभिनय क्षेत्रांच तुम्ही प्रशिक्षण घेतलंत का?
अभिनयाचं मी प्रशिक्षण घेतलं नाही. ज्येष्ठ कलाकारांचा अभिनय पाहत मी शिकलो. दिग्दर्शकही आपल्याला ते पात्र कसं दिसलं पाहिजे हे नेहमीच समजावून सांगत असतात. त्यामुळे दिग्दर्शक हाही एक प्रकारे अभिनयाचे धडेच देत असतो. मी डोंबिवलीत माझ्या कुटुंबासोबत राहतो. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची जबाबदारी आम्हा सर्व भावंडावर आली. घर चालवण्यासाठी काही तरी करणं गरजेचं होतं यासाठी एक पानटपरी टाकली. या पानटपरीच्या दुकानात अनेक महिला-पुरुष व्यक्तिमत्त्व रोज पाहण्यात येत असत. त्यांच्या सवयी तसेच विशिष्ट बोलण्याची पध्दत या गोष्टींचा वापर मला अभिनय करताना उपयोगी पडला. अभिनय करताना त्या व्यक्तिरेखेचं निरीक्षण महत्त्वाचं असतं. पण स्टेजवर काम करताना मी त्या भूमिकेत रममाण होऊन जातो. तसेच ज्यावेळी माझा कार्यक्रम दाखविण्यात येतो तेव्हा तो पाहताना माझ्या कामातील चुका शोधण्याचाही मी प्रयत्न करतो आणि त्या पुढे होणार नाहीत याचीही काळजी घेतो. लोकांना माझा अभिनय आवडतो. कारण मी त्यांना त्यांच्या घरातला एक वाटतो. त्यामुळे एकलव्यासारखं मी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं.

भाऊ फु बाई फु पासून तुम्हांला विनोदाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं तुमचा मूळ स्वभावही असंच आहे का ?
हो नक्कीच माझा मूळ स्वभावही विनोदीच आहे. आजही मला मित्रांसोबत नाक्यावर, कट्ट्यावर बसून भंकस करायला आवडते. यातून अनेक कल्पना सुचत जातात. काही विनोदही वापरता येतात. मी सांगितलेले विनोद हे सर्वांना अधिक आवडतात.

विनोदी रोल करताना गंभीर भूमिका करावी असं नाही का वाटत ?
नक्कीच वाटतं. वेगळ्या भूमिका साकाराव्या असं वाटतं. ‘टाईमपास’ मध्ये बापाची गंभीर भूमिकाही मी साकारली आहे. शिवाय ‘तुझं माझं जमेना’ मालिकेमध्ये नोकराचं कामही मी केलं आहे. संधी मिळाली तर नक्कीच वेगळ्या भूमिका मला करायला आवडतील.

नाटक, चित्रपट, मालिका, रियालिटी शो यांपैकी सगळ्यात जास्त कशात काम करायला आवडतं ?
नाटकातून शिकायला खूप मिळतं. प्रेक्षकांची दाद लगेच मिळते. लाइव्ह पर्फोमन्स असल्यामुळे चुकण्याची मुभा नसतेच. आणि सतत तालीम झाल्यामुळे सगळं पाठ असतं. मात्र ‘चला हवा येऊ द्या’ सारखा शो करणं चँलेज आहे. कारण ऐनवेळी स्क्रिप्ट दिलं जातं. त्यामुळे काही क्षणातच ते पात्र उभारावं लागतं. मला सर्वच क्षेत्र आवडतात.

तुमचा अभिनय घराघरांत पोहचला आहे. या अभिनयाच्या प्रवासातील काही किस्से आम्हांला ऐकायला आवडतील.
माझ्या या प्रवासातील आठवणी किस्से बरेच आहेत. पण असा प्रश्न विचारल्यावर डोळ्यांसमोर एक किस्सा कायम आठवतो तो म्हणजे एका माऊलीचा. तीन-चार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी ‘फु बाई फु’ त्यावेळी करत होतो. चांगल्या पदावर काम करणारी एक माऊली. या माऊलीच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा अकस्मात मृत्यू होतो.  या गोष्टीचा जबर धक्का या माऊलीला बसतो. ती नोकरीवरही जाऊ शकत नाही अशी अवस्था होते. मानसिक दृष्ट्या खचून जाते. माझं ‘फु’बाई फु’ मधलं ‘जँगो’ हे बालभूमिकेतलं पात्र मी करायचो. हे पात्र साकारताना मला त्या माऊलीनं बघितलं आणि ती बोलू लागली. तिला स्वतःची मुलगी माझ्या साकारलेल्या पात्रात दिसू लागली. त्या माऊलीने माझा संपर्क शोधून काढला. माझ्याशी बोलली. आणि ती माऊली आज बरी होऊन पुन्हा नोकरी करते आहे. त्यामुळे माझा अभिनयामुळे नक्कीच घराघरांत आनंद पोहोचतोय याचं समाधान माझ्यासाठी खूप मोठं आहे.

विनोदाचा दर्जा बदललाय का ? विनोद कशाप्रकारचे असावेत आणि त्याची मर्यादा काय ? ही मर्यादा कशी सांभाळावी लागते ?
नक्कीच. पूर्वीचे विनोद आणि आताचे विनोद यात तफावत आहे. शरीराचे अंगविक्षेप करून त्यावर विनोद केले जातात. कधी कधी आम्हालाही ते करावं लागतं. कारण एक वर्ग असा आहे त्यांना हे विनोद समजतात आणि आवडतात. वाहिनीचा trp लक्षात घेऊनही असे विनोद करावे लागतात. दुसऱ्या वर्गाला हे विनोद पानचट वाटतात. कारण समाजात सर्वच उच्च प्रतीचा विनोद समजणारे लोक नसतात. आणि  आमचा प्रेक्षकवर्ग हा मुंबईपुरता मर्यादित नाही आहे. तर खेडो-पाडीही आमचे प्रेक्षक आहेत त्यांचाही विचार करून विनोद केले जातात. शिवाय काही वेळा काही प्रसंगही हे शब्दापेक्षा कृतीतून लवकर कळतात त्यामुळे अशा प्रकारचे विनोद हे केले जातात. माझ्या मते विनोद हा लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना कळणारा असावा. माझा विनोदी अभिनय लोकांना आवडतो कारण मी बोजड भाषा वापरत नाही. लोकांना त्यांचा घरातला मी एक वाटतो. आणि यामुळेच विनोद सर्वांना समजतात. विनोद हे शाब्दिक असणं केव्हाही चांगलं. शक्यता कमरेखालचे विनोद टाळावेत त्यात अश्लीलता नसावी. कारण संपूर्ण कुटुंब टीव्ही, नाटक, विनोदी कार्यक्रम बघत असतात याचं भान ठेऊन विनोद लिहावेत असं मला वाटतं.  

महाराष्टात श्रीपादकृष्ण कोल्हटकर, ची, वी जोशी, अत्रे, पु. ल यांची विनोदी लेखनाची परंपरा आहे. आज मात्र त्या दर्जाचं विनोदी साहित्य निर्माण होतंय का ?
ही सर्व मंडळी म्हणजे विनोदाचे कर्ता करविता आहेत. ह्या मंडळींनी लिहिलेलं विनोदी साहित्य आणि यातले विनोद हे निखळ आनंद देणारे विनोद होते. तसं साहित्य आज निर्माण होताना दिसत नाही. आणि त्यांचं विनोदी साहित्य समजून घेणारा वाचक वर्गही आज तेवढ्या दर्जाचा आहे का असा प्रश्न पडतो. या मंडळींच्या विनोदी शैलीप्रमाणे विनोदी साहित्य निर्माण होणं गरजेचं आहे.

एकीकडे नाटक, ‘चला हवा येऊ द्या’, चित्रपट यामध्ये तुमचं काम सुरु असतं तेव्हा कधी ह्यातलं पात्र त्यात मिक्स होत नाही का ?
प्रत्येक ठिकाणी शुटींग हे वेगवगेळ्या दिवशी असतं. कुठचा रोल करायचा आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित  असतं. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो. आणि मगच ते सादर करतो त्यामुळे असं मिक्सिंग होत नाही.

तुमचे या क्षेत्रातील गुरु कोण ? आणि कुटुंबाचा तुमच्या या करियरसाठी पाठिंबा होता का?
विजय निकम हे माझे गुरु आहेत. bmc मध्ये ते नोकरी करतात. सुरुवातीला माझ्यातली कला बघून; “भाऊ बिनधास्त पणे तू तुझी कला सादर कर. तू उत्तम अभिनय करू शकतोस.” असा आत्मविश्वास त्यांनी मला दिला आणि वेळोवेळी मदतही केली. आणि कुटुंबाचा पाठिंबा सुरुवातीला नव्हता. कारण मी सामान्य मालवणी माणूस. घर संसार कसा चालणार. नट म्हणजे दर महिन्याला फिक्स इन्कम मिळेल असं नाही. पण बायकोला मी सांगितलं, ‘एक वर्ष मला दे यात मी नक्की सेटल होईन, आणि नाही झालो तर हे सगळं सोडून नोकरी करीन.’ पण देवाच्या आणि प्रेक्षकांच्या कृपेने, मला मिळालेल्या संधी आणि या क्षेत्रातल्या बऱ्याच मंडळींची मदत यामुळे मी आज नावारूपास आलो आहे असं मला वाटतं.

तुम्ही बऱ्याचदा मालवणी भाषेतून विनोद करता ते सर्वांना कळतात का ?
विनोदाला भाषेचं बंधन आहे असं म्हणता येणार नाही. आपल्यासमोर कोणता प्रेक्षकवर्ग आहे त्याला अनुसरून आम्ही भाषा वापरतो. मुंबईत ‘करून गेलो गाव’ हे मालवणी नाटक सादर करताना मी प्रेक्षकांशी संवाद साधतो त्यांना मालवणी कळते. पण विदर्भ, सातारा या ठिकाणी काही मालवणी विनोद कळत नाहीत तेव्हा त्यांना कळेल अशी भाषा आम्ही अभिनय करताना वापरतो.



आपल्या कोकणातील लोकांकडे कला असते परंतु त्यांना योग्य दिशा मिळत नाही. अनेक कलाकारांना या क्षेत्राकडे वळायचं असतं त्यांना थोडं मार्गदर्शन.
कोकणातील माणसाने स्वतःच्या विचारसरणीत थोडे बदल केले पाहिजेत. कोकणी माणसाची वृत्ती ही मी करतो ते बरोबर आहे अशी असते. पण ही वृत्ती बदलली तर अनेक मार्ग आपल्यासाठी खुले होतात. आसपासच्या तालुक्यातील लोकांनी कौतुक केलं की, मी करतो ते बरोबर, असं वाटतं आणि मग थोडासा का होईना माणूस स्वतःला परफेक्ट समजू लागतो. त्यापेक्षा तुम्ही कोणाला माहित नाही अशा ठिकाणी कला सादर करा म्हणजे तुमच्यात काय बदल हवे, काय बरोबर काय चुकतय ते समजतं. सुरुवातीच्या काळात तुम्ही एकांकिका, नाटक बसवणाऱ्या संस्थेत सहभागी व्हा. एकांकिका स्पर्धा करा कारण एकांकिका स्पर्धा करताना समोर परीक्षक असतात ते तुमच्या अभिनयाचं परीक्षण करत असतात. तुमचं काय बरोबर काय चुकीचं ह्याचं मार्गदर्शन मिळत. नंतर नाटक करा. सतत शिकण्याची वृत्ती ठेवा. आणि या क्षेत्रात यायचं तर स्ट्रगल, मेहनत, पेशन्स खूप लागतात. या गोष्टी जर कोकणातील लोकांनी आत्मसात केल्या तर आपल्या कोकणी माणसातले कलागुण हे नक्कीच सर्वांसमोर येतील.

आतपर्यंत भाऊंनी रानभूल, करून गेलो गाव ही नाटकं, टाईमपास / टाईमपास २ यांसारखे चित्रपट, मालिका, फु बाई फु आणि ‘चला हवा येऊ द्या’ हा सध्या गाजत असलेला झी मराठी वरील टीव्ही शो तसेच अनेक कार्यक्रमांत विनोदी स्कीट करून त्यांनी आपली अभिनय कला दाखवली. आणि आज भाऊकदम हे नाव आबालवृद्धांच्या तोंडून सतत ऐकायला मिळत. आपल्या कोकणातली मालवणी माती ही कलेच्या दृष्टीने चांगलीच पोषक आहे. आणि आज अनेक कलाकार कोकणी असून त्यांनी कोकणातील कला दाखवून एक बदल घडवला आहे. हाच बदल आपणाला नक्कीच पुढे घेऊन जाईल. अतिशय शांत, गोड स्वभावाच्या भाऊ कदम  यांना मला भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या. हा अविस्मरणीय क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.
-शब्दांकन : क्रांती गोडबोले-पाटील
Krantigodbole530@gmail.com



Tuesday, 5 January 2016

कोकणचा कोहिनूर

कौतिक सांगू किती, पठ्ठ्या बहुगुणी ! या गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या पंक्तीप्रमाणेच गुरु ठाकूर याचं व्यक्तिमत्त्व... वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण हे गुरु ठाकूर याचं मूळ गाव. जन्मभूमी मुंबई असली तरी सुट्टीत न चुकता गुरु गावी यायचे. आणि या गावातील मातीमुळे मी घडलो असं अभिमानाने गुरु सर सांगतात. मुळात अष्टपैलू असं व्यक्तिमत्त्व, म्हणजे राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणारे गुरु ठाकूर स्तंभलेखन, कथा-पटकथा, संवाद लेखन, गीतकार, अभिनेता, कवी, छायाचित्रकार  अशी अष्टावधानी कसरत करत असतात. मोजकेच काम करेन पण लोकांच्या कायम स्मरणात राहील असं काम करीन हा आग्रह कायमच गुरु सरांचा असतो. केवळ चमकेगिरी करणं हे गुरु सरांना बिलकुल आवडत नाही. जगभारत पोचेलेले हे रत्न सतत आपल्या कामात आणि नवीन कलाकृती निर्माण करण्यात मग्न असते. मलाही याची प्रचीती आली. गुरु सरांना भेटण्याची संधी मला मिळाली नाही कारण गुरु सर परदेशी दौऱ्यावर होते म्हणून त्यांची मुलाखत फोनवरूनच घेतली. माणूस न भेटता ही माणसाच्या बोलण्यातला नम्रपणा, साधेपणा आपण ओळखू शकतो. गुरु ठाकूरही अगदी असेच.
गुरु ठाकूर याचं मुंबईतच सारं शिक्षण झालं. कॉमर्स घेऊन ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं. घराण्यातलं कोणी या क्षेत्रात नाही, विशेष या क्षेत्राचं प्रशिक्षण नाही सगळं काही शून्यातून निर्माण करत स्वतःची एक वेगळी ओळख गुरु सरांनी निर्माण केली ती केवळ मेहनतीने. मुंबईत शिकत असताना गरजेतून अचानक कविता लिहिली जाते, गाणं म्हटलं जातं, लिहिलं जातं, मॉडेलिंगही करतो, मालिकांसाठी संवादही लेखन सुरु होतं अशा अनेक कला बाहेर पडू लागतात. आणि मग सर्वांच्या चर्चेत एक नाव सतत ऐकू येऊ लागतं ते म्हणजे गुरु ठाकूर. 

बालपणाविषयी- बालपणाविषयी विचारले असता गुरु सर म्हणाले, लहानपणी खूपच बुजरा होतो. चार लोकांसमोर बोलण्याचं धाडसही माझ्यात नव्हतं. तेव्हा रेडीओचा प्रभाव अधिकच होता. गाणी सतत कानावर पडायची. त्यामुळे अनेक दिग्गज मंडळींची गाणी नुसतीच ऐकली नव्हती तर ती मनातही खचून भरली होती. शिवाय सुट्टीत कोकणात गेल्यावर गाण्याच्या भेंड्या खेळायचो. मला जुनी गाणी आणि त्यांच्या चाली आठवायच्या. पण अंतऱ्यातले शब्द विसरायचो. मग भेंड्या खेळताना मी मुखडा कायम ठेवून, पुढचे शब्द ऐनवेळी मला सुचतील ते माझ्या मनातले पेरायचो. मी असं काही करतोय हे कोणाला कळायचं नाही. इतके माझे शब्द बरोबर त्या चालीत बसायचे. मात्र एके दिवशी ही माझी चोरी माझ्या काकांनी पकडली. मी खाली मान घालत कबूल केली. काका हे पाहून म्हणाले की अरे, असा खाली मान घालून पडलेला चेहरा का करतोस ? तुझे शब्द म्हणजे उत्तम कविता आहे. मोठेपणी तू नक्की एक चांगला गीतकार बनशील. आणि काकांचे हे शब्द खरे ठरले. लेखनाने मला आत्मविश्वास दिला.

गीतकार म्हणून सुरुवात- शाळा-कॉलेजला असताना पुढे काय करायचं हे अजिबात ठरवलं नव्हतं.
खरं तर व्यंगचित्रकार म्हणून मी करिअरला सुरवात केली. स्तंभलेखन केलं. कॉलेजला असताना एकांकिका बसवायचो त्यात मी अभिनय करायचो. एक एकांकिका करताना त्यातील एका प्रसंगात गाण्याची गरज होती.चाल लावणारे होते पण शब्द दिग्गज कवींच वापरले तर त्यांची परवानगी, त्यांचं मानधन परवडलं पाहिजे म्हणून मीच एकांकीकेतल्या त्या प्रसंगाला अनुसरून कविता लिहून टाकली ते शब्द असे होते- हळुवार सांजवेळी, मन का उदास आहे’. ही माझी चालीवर पहिली कविता. पुढे माझा मित्र अमोल बावडेकर याने सुगम संगीताच्या कार्य्क्रमात ती रेडिओवर सादर केली तीथे माझी ओळख गीतकार म्हणून प्रथम झाली. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे या गाण्यापासून मी चित्रपट गीतकार म्हणून नावारूपास आलो.

व्यंगचित्रकार ते संवाद लेखन - व्यंगचित्रांच्या निमित्तानं माणसाचं निरीक्षण करण्याची माझी शक्ती वाढली. या निरीक्षणातूनच व्यक्तिचित्रं लिहू लागलो. नाटकात, मालिकेच्या चित्रीकरणस्थळी, स्टुडीओत दिसणारी माणसं- त्याचं वागणं-बोलणं याचा सतत विचार मनात सुरु असायचा. त्यांतूनच मालिकांमधली व्यक्तिचित्रं उमटली आणि गंगाधर टिपरे,नटरंग ते अगदी नारबाची वाडी पर्यंतच्या  संवाद लेख्नाला  मिळालेली दाद आणि पुरस्कार याचं ्श्रेय माझ्यातल्या व्यंगचित्रकाराला जा्तं.

मॉडेलिंग आणि अभिनय - एक एक क्षेत्रात पाऊल ठेवता-ठेवता मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्राकडेही वळलो. सुरुवातीला जाहिरातीतून मोडेलिंग केलं.अनेक हिंदी मालिकांतून अभिनयही केला.पण गीतलेख्नाचा व्याप वाढला अन या गोष्टी थांबवल्या. बर्याच वर्षानी नटरंग चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली. लवकरच  “गणवेषया चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यवर  रसिकांच्या भेटीला येतोय.

कोकणातल्या निसर्गाचा लेखनासाठी काही उपयोग झाला का ?
यावर गुरु सर म्हणाले कोकणामुळेच मी घडलो.मे मध्ये गावी कोकणात जायचो तेव्हा तिथला मध्येच अवतारणारा पाऊस, अंगणात टाकलेली वाळवणं, पाऊस आल्यावर उचलण्याची तारांबळ, पावसानंतरचा तिन्हीसांजेचा धुंद गारवा, ओलेती सांज, आवडता मारावा ऐकून शब्दांची गुंफण झाली आणि कागदावर उतरली- सरसरती हवा, छेडे मारवामग हीच कविता अगंबाई अरेच्चा मधल्या गीतांजलीच्या संवादात अंतर्भूत केलीय. त्यामुळे या कोकणातल्या निसर्गानं मला भरभरून दिलंय

तुम्ही एवढे प्रसिद्धीच्या झोतात आहात तरीही तुम्ही या प्रसिद्धीपासून दूर असता तुमचा स्वभावही शांत आहे असं ऐकलंय याविषयी काय सांगाल  माझ्याविषयी असं सांगणं चुकीच वाटेल. पण मी शांत स्वभावाचा आहे. पटकन चिडणं नाही जमत मला. समोरच्याच्या चुकीच्या वागण्याचा मी संताप करून घेत नाही किंबहुना ती व्यक्ती अशी का वागली असेल असा सकारात्मक विचार मी नेहमी करतो. आणि मला मी हे केलं हे दाखवण्यापेक्षा अजून नवीन चांगलं प्रेक्षकांना काय देता येईल या विचार कायम माझ्या मनात असतो आणि त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू असते.     

तुमच्या प्रसिद्ध गाण्यांची यादी केली तर बाकीची मुलाखत प्रसिद्ध करायला जागा पुरणार नाही. पण नटरंगची गाणी, मन उधाण वाऱ्याचे, ही गुलाबी हवा, आत्ताच माऊली- माऊली, हरवली पाखरे, मला वेड लागले यांसारखी वेगवेगळ्या विषयांची हिट गाणी आणि त्यातील अर्थपूर्ण शब्दांची गुंफण कशी काय जमते ? यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात का ? याबद्दल थोडक्यात- खरं सांगायचं तर आवड आणि ध्यास जर हातात हात घालून असतील तर तुमच्या नशिबी यश येते असं मला वाटतं. भरपूर वाचन, निरीक्षण हे कवीसाठी- लेखकासाठी अत्यंत गरजेचं असतं. उदा पंढरपूरला जाणारी वारी आपण अनेकदा पाहिली आहे. परंतु त्यावेळी त्या वारकऱ्यांचे मनातले भाव काय असतील याचा विचार जेव्हा आपण बारकाइने केला तर त्याच्या आणखी नवीन बाजूही आपल्या लक्षात येतात. कधी-कधी आधी गाण्याची चाल ठरवली जाते आणि मग त्यात फिट बसणारे शब्द हे गीतकाराला गुंफावे लागतात. हे माझ्यासाठी आव्हान असतं. परंतू अनुभव, सराव, निरीक्षण, वाचन आणि योग्य प्रकारे जमवलेल्या ज्ञानाचं उपयोजन करण्याचा माझा प्रयत्न आणि परमेश्वराची साथ यामुळे हे सारं शक्य होतं असं मला वाटतं.

आज तुम्ही यशाच्या शिखरावर आहात. परंतु या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतलात तेव्हा घरच्यांचा पाठींबा होता का ? आजच्या घडीला घरच्यांची काय प्रतिक्रिया असते ?
मी मध्यमवर्गीय घरातला असल्याने माझा चित्रपट क्षेत्रात जाण्याच्या निर्णयाने नातेवाईक नाराज होते पण आई-वडील ठामपणे माझ्या पाठीशी उभे होते. त्यांना एक आतून खात्री होती की, मी याच क्षेत्रात यशस्वी होईन. आज माझ्या आई-वडिलांचा विश्वास सार्थकी ठरला आहे. त्यामुळे सगळेच आनंदी आहेत.

जीवनातला, क्षेत्रातला आदर्श- बऱ्याचदा आदर्श कोण या क्षेत्रातला असं विचारलं जातं. जसं आताही मला तू विचारलस. तसा आदर्श कोणी नाही पण घरात लहानपणापासून दासबोध वाचला जातो त्यात समर्थानी दिलेला मंत्र मनावर कोरला गेलाय किर्ती पाहो जाता सुख नाही  सुख पाहता किर्ती नाही ।विचारेविण कोठेचिनाही।समाधान। ।।आजोबा म्हणत कीर्तिवंत व्हावं प्रसिद्ध कोणीही होतो. मला वाटतं निरपेक्षपणे स्वकर्तव्य बजावत राहिले म्हणजे नको म्हणत असताही किर्ती मागेलागते.  एकदा आदर्श पटकथाकार कोण असं विचारलं तेव्हा मी डेस्टिनी असं उत्तर दिलं आजही माझं हेच उत्तर असतं. माझ्या आयुष्यात असे प्रसंग येत गेले की काहीच ण ठरवता मला दिशा मिळत गेली. वेळेचा पुरेपूर उपयोग करत राहिलो आणि जाही करतोय. झोपल्याने आयुष्यातील बराच वेळ वाया जातो म्हणून मी रोज पहाटे दीड वाजेपर्यंत काम करतो आणि थोडावेळ झोपून लगेच सहाला उठतो. सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करत राहण्याचं व्यसनच मला जडलंय. अगदी छोट्या छोट्या अनुभवाचा फायदा कुठेना कुठे होतोच. वाया काहीच जात नसतं.

वाचकांकडून आलले अनुभव आणि लोकांच्या प्रतिक्रिया- अनेक अनुभव आणि प्रतिक्रिया आहेत पण ज्या लगेच डोळ्यांसमोर येतात त्यातला वाचकाचा एक अनुभव सांगतो- असे जगावेम्हणून माझी सोशल मिडिआवर एक कविता आहे. या कवितेवर एका मुलीने कमेंट लिहिली होती की तिची एक मैत्रीण डिप्रेशनमध्ये गेली होती. आणि आत्महत्या करणार होती पण तिने ही कविता वाचली आणि तिचा आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन बदलला. हे वाचून मला खूप आनंद झाला. असे अनुभव वाचतो तेव्हा वाचकांसाठी अजून काहीतरी चांगलं लिहावं अशी प्रेरणा मिळत राहते. मी स्वतः खूपच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन चालणारा आहे. माझ्याही स्ट्रगलिंगच्या काळात माझ्या चेहऱ्यावर उत्साह कायम असायचा. सगळ्यांना याचं आश्चर्य वाटायचं याचही उत्तर मी चारोळीतून दिलं- खिशास भोके सत्त्याहत्तर, तरी चेहरा हसरा आहे, माझ्यासाठी जगणे-उत्सव रोज दिवाळी दसरा आहे...
माझ्या कामाबद्दल लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येत असतात. नटरंग केला तेव्हाची आठवण सांगतो. कारण नटरंग मध्ये माझ्यावर पटकथा, गीतलेखन, अभिनय अशा तीन भूमिका होत्या. गाजलेल्या आणि माहिती असलेल्या कादंबरीवर हा चित्रपट करत होतो. सत्तर-ऐंशी पूर्वीचा काळ दाखवायचा. आणि यासाठी रिसर्च आणि खूप अभ्यास करावा लागला. कोल्हापुरी भाषेचा लहेजा शिकण्यासाठी कोल्हापुरात राहिलो. त्या भागातल्या लोकांच्या बोलण्याचा, विशेष करून वयस्कर व्यक्तींचं निरीकाष्ण केलं. शिव्यांपासून ओव्यांपर्यंत सारे बारकावे जाणून घेतले आणि संवाद लिहिले. लावणीच्या पारंपारिक बाजाचा  अभ्यास केला. आणि लावण्या रचल्या आणि  प्रत्यक्ष खेबुडकरांनी त्या करता कौतुक केलं आण्खी काय हवं..पुन्हा एकदा लावणी तरुणाईच्या ऒठावर आली.त्यात अश्लिल्ता टाळली त्यामुळे ती शब्दांसह साम्न्यांच्या ओठावर रुळली. तेच महत्वाचं असतं तसंच आज माऊली गाणं ऐकताना लोक सांगतात की गाणं ऐकताना आपणही त्या वारीत आहोत असंच वाटतं. आणि हे माझं एकट्याच क्रेडीट नाहीये अजय-अतुल याचं संगीतही भन्नाटच आहे.


अजय-अतुल, अशोक पत्की यांच्यासोबत काम करतानाचा तुमचा अनुभव- तू तू मीनाटकाच्या निमित्ताने माझी ओळख संगीतकार अशोक पत्की यांच्याशी झाली. त्यांची काम समजावण्याची पद्धत आवडली, सूर जुळले आणि मग सोबत काम करू लागलो. याच दरम्यान अजय-अतुल पत्की काकांबरोबर काम करत होते. त्यांच्यासोबत गीत-संगीताचे प्रयोग केले. आमची वेव्हलेंग्थ जुळते त्यामुळे आमची गाणी हिट होतात असं वाटतं.

तुम्ही साप्ताहिक मालिका लेखन करणं सोडून दिलंय का ? हिंदीतही काम करायला आवडेल का ?
हसा चकट फू साठी संवाद लेखन केलं, जगावेगळी नावाची मालिका केली. मात्र गंगाधर टिपरे मालिका पूर्ण झाल्यावर मात्र मी मालिका लेखन करणं सोडलं. कारण माझ्या मते मला टीव्हीमालिका या वृत्तपत्रासारख्या वाटतात. लोकांना रोज काहीतरी नवीन हवं असतं. रविवाराचं वर्तमानपत्र कितीही इनटरेस्तिंग असलं तरी सोमवारी त्याची रद्दीच होते. मालिकेचा एखादा एपिसोड मस्त लिहिला लोकांना आवडला तरी रिपीट टेलिकास्ट म्हणून बघताना लोकांना कंटाळा येतो. टीआरपी आणि पत्राची लोकप्रियता लक्षात ठेवून मालिका लिहावी लागते. मूळ कथानक बाजूला पडतं. आणि तिथेच कलाकृती संपते आणि व्यापार चालू होतो. मग नाविन्यतेचं समाधान मिळत नाही. म्हणून मी मालिका लिहणं थांबवलं. हिंदित ऑफर बऱ्याच आल्या पण त्या तितक्या समाधान देणा-या नव्हत्या. विधू विनेद चोप्डांच्या फेरारी की सवारी करता मी गीतलेखन केलं होतं. त्याच कौतुक ही झालं तशी संधी मिळाली तर मी हिंदीमध्ये अजूनही काम करीन.  

तुमचे आवडते गीतकार, लेखक, आवडतं ठिकाण, तुम्ही रचलेलं आवडतं गाणं कोणतं?
ज्ञानोबा तुकोबां पासून ते ग. दि. माडगुळकर,खेबुड्करांपर्यंत सारेच गीतकार म्हणून मला आवडतात. लेखकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुलंच्या व्यक्तिरेखांनी मला भारावून टाकलय. जयवंत दळवी यांच्या कथा वाचून आपणही लिहावं असं वाटलं. आणि विजय तेंडूलकर यांच्यामुळे पटकथा आणि नाट्यलेखनाकडे पहायची एक वेगळी दृष्टी मिळाली. तळकोकण हे माझं आवडतं ठिकाण आहे. माझं मी रचलेलं आवडतं गाणं सांगणं कठीण आहे कारण आईला आपली सर्वच मुले ही सारखीच असतात.

पुरस्कारांनाविषयी- बापरे! पुरस्कारांचीही यादी मोठी आहे. विकिपिडीयावर ही यादी वाचकांना वाचता येईल पण इथे आवर्जून एका पुरस्काराविषयी नक्कीच सांगावसं वाटतं नटरंगचं शुटींग चालू असताना त्या भागातले काहीजण मला येऊन विचारायचे की तुम्ही इथलेच का तेव्हा माझ्या अभ्यासाला मिळालेली पाहिली पावती मला वाटते. खुद्द आनंद यादवांनी जेव्हा सिनेमा पहिला तेव्हा माझ्या भाषेचा गोडवा, सौंदर्य शंभर टक्के जपल्याबद्दल शंभरपैकी शंभर मार्क्स अशी पावती दिली तेव्हा हा कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. 

कोकणातही अनेक लेखक मंडळी लिहण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना योग्य दिशा मिळत नाही त्याबद्दल मार्गदर्शनपर काय सांगाल-
खरंतर लेखन  ही प्रत्यएकाची व्यक्त होण्याची पद्धत असते आपली स्वतंत्र शैली निर्माण करा आणि ती जपा. कुणासारखं तरी करायचा प्रयत्नही नको कारण ते त्यानी करुन झालंय.तुमचं नवं निराळं असेल तर त्याला जास्त किंम्मत आहे.चांगलं अणि अथक लिहित रहा लोक आपोआप दखल घेतील.
  
डिजिटल काळात वाचन करणे हरवत चाललय त्याबद्दल तुमचं मत-
मला नाही वाटत. ज्याना आवड आहे ते वाचतातच.केवळ माध्यम बदललंय.पुस्तकांची जागा टॅब ने किंडल ने घेतलीय तरुणाई ऑनलाईन वाचतेय..लेखक,प्रकाशकाना वि्शेषत: मराठी लेखकांना याची द्खल घ्यावी लागेल.तिथवर आपलं साहित्य पोचवावं लागेल.
सहज-सुंदर लिखाण हे गुरु ठाकूर यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. खरंच या अलौकिक व्यक्तिमत्त्वाला भेटता आलं असतं तर माझा आनंद द्विगुणीत झाला असता. परंतु हे ही नसे थोडके. फोनवरून त्यांनी माझ्याशी संवाद साधला. आणि छान गप्पा रंगल्या. त्यांचा ह्या क्षेत्रातील प्रवास, अष्टावधानी रूप पाहिल्यावर एवढंच म्हणावसं वाटतं- गुरु नावातच नाही कार्यातही गुरुच आहे.
-शब्दांकन : क्रांती गोडबोले-पाटील



बॉक्स
ज्या कोकणाने घडवलं त्या कोकणाचं वर्णन करणारी गुरु ठाकूर यांची कविता खास कोकणी वाचकांसाठी गुरु ठाकूर यांनी दिली आहे-
पाचुच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
पिवळी पिवळी
बिट्ट्याची काचोळी
नेसल्या डोंगर वाटा
माळून गजरे
फेसाचे साजिरे
सजल्या सागर लाटा
इथल्या रानात तसाच मनांत झरतो मायेचा झरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
गंधीत धुंदीत
सायली चमेली
लाजरी लाजेची पोर
पळस पांगारा
पिंपळ पसारा
जीवाला लावतो घोर
घंटेचा निनाद घालुनिया साद सांगतो जा पोरी घरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
आंब्याला मोहर
बकुळी बहर
कहर चाफा फुले
माडाच्या सांदीला
झाडाच्या फांदीला
ईवला खोपा झुले
बोलतो कोकिळ त्याच्या ग मंजूळ तोंडाला नाही थारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
-गुरु ठाकूर